Sunday 12 July 2020

ते जाण तू कीर्तन...

ते जाण तू कीर्तन...


कीर्तनात वक्तृत्व असावे पण प्रचार सभेतले नसावे .
कीर्तनात गायन असावे पण मैफिलीतले नसावे .
कीर्तनात विनोद असावा पण वगाताला नसावा .
कीर्तनात नृत्य असावे पण फडातले नसावे .
कीर्तनात अभिनय असावा पण नाटकातील नसावा .
 ही कीर्तनाची पंचपदी नेहमी आमचे आजोबा सांगत असतं.आज समाजात होणारी कीर्तनांची संख्या व कीर्तनकारांची संख्या पहाता ,कीर्तन ही परंपरा आजही समाजात मोठ्या सन्मानाने जपली जात आहे असेच म्हणावे लागेल  .समाजाने या परंपरेला व कीर्तनकारांना आदर व प्रेम भरभरून दिले आहे .यात कोणाचेच दुमत नाही .देवर्षी नारद यांच्या पासून सुरु झालेली ही कीर्तन भक्ती संत नामदेव ,समर्थ रामदास ,संत तुकाराम आणि अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यावयाचे झाल्यास गाडगे बाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी नेटानी चालवली .कीर्तन ही जशी भक्ती परंपरा आहे तशीच ती प्रबोधनाचीही परंपरा आहे .ती जशी ईश्वरोपासाना आहे तशीच ती समाज पुरुषांचीही उपासना आहे .पण अलीकडच्या काळात जीवनाची जी गतीमान शैली  बनली आहे त्याचा परिणाम या परंपरेवरही झालेला दिसतो .काळाची गती ही कितीही भरधाव असली तरीही पूर्वजांनी जोपासलेल्या कीर्तानासारख्या परंपरांनीच  समाजाचे स्वास्थ्य ,समाजातील मानवता ,जीवन मूल्ये टिकवून ठेवली आहेत हे समाजाने जेव्हडे लक्षात ठेवले पाहिजे त्याहून कितीतरी तीव्रतेने या गोष्टीचे भान या परंपरेच्या किंबहुना नारदांच्या पाईकांनी ठेवणे गरजेचे आहे .
                                     कृत ,त्रेत ,द्वापार ,आणि कली या चारही युगात कीर्तन ही भक्ती  परंपरा असल्याची  वर्णने वेद ,शास्त्र आणि पौराणिक ग्रंथातून पहावयास मिळतील .आणखीही एक महत्वाचे असे आढळेल की कीर्तन हा अनेक कलांचा एकत्रित आविष्कार आहे .वक्तृत्त्व ,गायन ,विनोद,नृत्य ,आणि अभिनय या पाच कला आज जरी आपल्याला या आविष्कारात दिसत असल्या तरी ईतरही बऱ्याच कला प्राचीन कीर्तनकारांना अवगत असव्यात अशा तर्काला वाव आहे . कीर्तनकार या सर्व कलांचा एकत्रित उपयोग मोठ्या खुबीने कीर्तनातून समाज प्रबोधनासाठी करतात .आणि ज्याला हे जमते तोच उत्कृष्ट कीर्तनकार बनू शकतो .
                                     देवर्षी नारदांनी कीर्तनातून प्रचंड प्रबोधन केले .'नारद भक्तीसूत्रे 'जगाला दिली .देव आणि दैत्य या सनातन संघर्षात नारदांची भूमिका खूप महत्वाची होती .नारद दोनीही पक्षांना प्रिय होते .दोनीही कडे नारादांचा सारखाच आदर सत्कार होई.पण नारदांनी कधी सत्याग्रह सोडला नाही .हितकारक गोष्टींसाठी त्यानी जसे दैत्यांसोबत कपट केले, तसेच देवांचाही पाय घसरल्यावर त्यानी विविध कारस्थाने रचून  त्याना सरळ केल्याची उदाहरणे आहेत .तात्पर्य काय? तर समाज हिताची सदैव काळजी घेणारे असे नारद होते .आपण एखाद्याला उपहासाने 'कळीचा नारद 'असे संबोधतो पण नारद कळकळीचे  होते हे सुज्ञांनीतरी  विसरू नये .वाल्याकोळी ,बाळ ध्रुव ,पतिव्रता सावित्री ,वेदव्यास ,दैत्यराज्ञी कयाधू  ,हैर्यश्व ,शबलाश्व,देवस्त्रिया लक्ष्मी ,सावित्री ,पार्वती ,आणि साक्षात भगवान गोपाल कृष्णाचे माता -पिता वासुदेव देवकी  यांना जर नारद भेटलेच नसते तर ?असा प्रश्न मला नेहमी पडतो .या सर्वांना नारद भेटले म्हणूनच या लोकांच्या फार मोठ्या विवंचना दूर झाल्या . नारद या सर्वांच्या निमंत्रणावरून व या सर्वांशी मानधन ठरवून भेटीला गेले नव्हते हे त्याहून विशेष .ही कांही नमुन्याची उदाहरणे आहेत .नारादांना या सर्वांच्या हिताची कळकळ होती म्हणून नारदांनी अपार मेहनत घेऊन त्यांचे हित होईल असे मार्गदर्शन या सर्वाना व तत्कालीन समाजाला वेळोवेळी केले .पण या मार्गदर्शनाचे ,प्रबोधनाचे मध्यम त्यानी निवडले ते कीर्तनच .
नारद हे ब्राह्मदेवांचे मानसपुत्र होते .ब्राह्मदेवांचेकार्य सृष्टी निर्मिती  पण या सृष्टीच्या सर्वोत्तम प्रतिनिधी 'मनुष्यजीवाला' शिव पदापर्यंत जाण्याचा मार्ग अगदी त्याला पटेल ,रुचेल ,पचेल अशा शब्दात रंजकतेने कीर्तनाच्या माध्यमातून  सांगितला तो  आमच्या देवर्षी नारदांनी.जीवाला त्याचे ध्येय्य /साध्य निश्चित करण्यात कीर्तन परंपरेचा मोलाचा वाटा आहे .मनुष्य  जीव जसा ब्रह्मदेवांच्या सृष्टीतला सर्वोत्तम निर्मिती आहे तसेच त्याचे गंतव्य /साध्य /ध्येय्य असावे याचा पायाभूत विचार केला तो नारदांच्या या 'कीर्तन' संस्थेनेच .जीवाने कुठपर्यंत प्रगती करावी तर शिव पदापर्यंत करावी हे कीर्तन सांगते .नारायणाचेच  स्मरण किंवा  त्याच्या लीला व गुणांचे  वर्णन का करायचे तर मनुष्य जीवास त्याच्या साध्याची कल्पना यावी म्हणून .नारदांचे प्रत्येक कीर्तन याच उद्देशाचे होते म्हणूनच वाल्याचाही वाल्मिकी झाला ,ध्रुवास अढळपद मिळाले .सावित्रीस सत्यावान मिळाला .व्यासांची श्रीमद्भागवत रचना झाली . या अशा घटना तत्कालीन समाजात घडून तत्कालीन समाजजीवन एका विशिष्ट नैतिक व आध्यात्मिक उंचीवर पोहचून नंतरच्या युगायुगांना आदर्शवत ठरले . कीर्तन भक्तीचे हेच आद्य लक्षण असावे . 
भक्तीज्ञानसुधा अतिप्रिय बुधा ;वारी मुमुक्षा क्षुधा |
देई षड्रीपुना त्वरे करुनिया ;जिंकावया आयुधां |
होई शुद्ध पवित्र निर्मल सदा; गंगेपरी वर्तन |
शोषोनी भवसिन्धु बिंदुनुरवी;ते जाण तू कीर्तन ||१||
कीर्तन कसे असावे ?तर हे असे. नारदांच्या कीर्तनासारखे.भक्तीच्या माध्यमातून बुधजनांची मोक्षक्षुधा हरण करणाऱ्या ज्ञानसुधेचा आविष्कार करणारे...कामक्रोधादी सहा शत्रूंना त्वरित जिंकून घेणारे ...जे ऐकताच किंवा करताच गंगेच्या  प्रवाहा प्रमाणे पवित्र वर्तन घडेल असे..भवसागर शोषून त्याचा थेंबही शिल्लक न ठेवणारे .असे कीर्तन वक्ता आणि श्रोता दोहोंचाही उद्धार करते.

©श्रीपाद मुळे (गोंदीकर)